स्टोरी टाकण्याला ‘जितेंद्र अवॉर्ड’ आहे का? 😎

आपली आवड म्हणजे अंतिम सत्य नाही; दुसऱ्याच्या निरुपद्रवी निवडींना judge न करता त्याला त्याच्या पद्धतीने जगू देण्यावरचा हा लेख.

Funny banner for the blog: a playful Marathi social-media vs private-life illustration

बऱ्याच दिवसांपूर्वी एक मित्र (मित्र?) मला म्हणाला,

“काय रे, रोजच मूर्खासारखं काहीही टाकत असतोस स्टेटसला, स्टोरीला. कस जमतं तुला? प्रायव्हेट राहायला शिक. हे काय असं उठ सुठ टाकत असतो काहीही.”

मी म्हटलं, “हो यार, बरोबर बोलतोयस तू.”

क्षणभर त्याला वाटलं असावं की आज आपल्या प्रगल्भ विचारांनी ह्याचं आयुष्य बदलून टाकलं. आता हा माणूस उद्यापासून सोशल मीडिया डिलीट करून हिमालयात एखाद्या गुहेत प्रायव्हेट आयुष्य जगायला जाणार.

मग मी विचारलं,

“पण तुला प्रायव्हेट आयुष्य जगण्याचा कोणता अवॉर्ड मिळाला रे? एखादा ‘जितेंद्र अवॉर्ड’ तरी दिलाच असेल ना?” 😁

तो हसला. विषय तिथे संपला.

पण माझ्या डोक्यात मात्र तो विषय तिथे संपला नाही.

कारण स्टोरी आणि स्टेटस हा फक्त एक बहाणा आहे. खरा विषय वेगळाच आहे.

आपल्याला दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल एवढं judgement द्यायची गरज का वाटते?

स्टेटस टाकणारा उथळ आणि न टाकणारा अध्यात्मिक?

आपल्याकडे काही गोष्टींना उगाचच चारित्र्याचं सर्टिफिकेट जोडण्याची पद्धत आहे.

एखादा माणूस रोज फोटो टाकतो, स्टोरी टाकतो, कुठे गेला, काय खाल्लं, काय वाचलं, कोणतं गाणं ऐकतोय हे शेअर करतो. लगेच कोणीतरी म्हणणार,

“ह्यांना आयुष्य जगण्यापेक्षा दाखवण्यात जास्त इंटरेस्ट असतो.”

दुसरा माणूस वर्षातून एक फोटो टाकतो. त्याच्या प्रोफाइलवर गेल्यावर शेवटचा फोटो ‘Happy New Year 2022’ दिसतो.

त्याच्याबद्दल लगेच,

“हा बघ. किती mature आहे. Private person!”

अरे पण कशावरून?

कदाचित पहिल्या माणसाला व्यक्त व्हायला आवडत असेल आणि दुसऱ्याला सोशल मीडिया वापरायचा कंटाळा असेल. एवढाच फरक असेल.

स्टेटस न टाकल्याने माणसाला गौतम बुद्धांचं ज्ञान प्राप्त होत नाही आणि दिवसाला चार स्टोरी टाकल्याने त्याची बौद्धिक पातळी समुद्रसपाटीच्या खाली जात नाही.

दोन्ही फक्त वेगवेगळ्या आवडी असू शकतात.

मला गंमत ह्याची वाटते की काही लोकांना स्वतःची choice ही फक्त choice वाटत नाही. त्यांना ती श्रेष्ठ जीवनपद्धती वाटायला लागते.

“मी सोशल मीडियावर फार काही टाकत नाही.”

छान आहे.

“मला माझं आयुष्य private ठेवायला आवडतं.”

अजून छान.

पण त्यापुढचं वाक्य जर,

“तुमच्यासारखे लोक कसे काय सगळं टाकत बसतात, मला कळत नाही.”

असं असेल, तर गाडी choice च्या स्टेशनवरून निघून judgement च्या स्टेशनला पोहोचली आहे.

तुमचं ‘मला नाही आवडत’ हे दुसऱ्याचं ‘चुकीचं’ कधी झालं?

हा प्रश्न फक्त सोशल मीडियापुरता नाही.

मला ट्रेकिंग आवडतं. तुम्हाला रिसॉर्टमध्ये जाऊन चार दिवस पडून राहायला आवडतं.

मला गर्दीत फिरायला आवडतं. तुम्हाला घरी पुस्तक घेऊन बसायला आवडतं.

कोणाला लग्न करायचंय. कोणाला नाही.

कोणाला दर शनिवार-रविवार बाहेर जायचंय. कोणाला रविवार म्हणजे पंख्याखाली लोळत Netflix बघत आयुष्याचा अर्थ शोधायचा आहे.

कोणाला वाढदिवसाला पन्नास लोक हवे आहेत. कोणाला दोन मित्र आणि एक केक पुरतो.

आणि गंमत म्हणजे हे सगळे लोक बरोबर असू शकतात.

कारण प्रत्येक प्रश्नाला एकच योग्य उत्तर असतं ही शाळेच्या परीक्षेची सवय आहे. आयुष्य तसं चालत नाही.

आपण मात्र आपल्या उत्तराला answer key समजून फिरत असतो.

“मला हे आवडत नाही.”

इथपर्यंत ठीक आहे.

पण नकळत पुढचं गणित असं होतं—

मला आवडत नाही
= हे चांगलं नाही
= हे करणारे लोक चुकीचे आहेत
= त्यांना हे सांगणं माझं सामाजिक कर्तव्य आहे.

आणि मग आपल्यातला विनामूल्य सल्लागार जागा होतो.

काही लोकांच्या डोक्यात एक अदृश्य कोर्ट सुरू असतं

आपल्या आसपास काही माणसं अशी असतात की त्यांच्या डोक्यात कायम एक कोर्ट चालू असतं.

समोरचा काय घालतोय — judgement.

किती फोटो टाकतोय — judgement.

कुठे फिरायला जातोय — judgement.

किती खर्च करतोय — judgement.

लग्न का करत नाही — judgement.

लग्न केलं तर मूल कधी — judgement.

मूल झालं तर दुसरं कधी — judgement.

दुसरं झालं तर “आजकालच्या महागाईत दोन कशाला?” — पुन्हा judgement.

म्हणजे आरोपी काहीही करो, निकाल तयार आहे.

विशेष म्हणजे ह्या कोर्टात आरोपीला वकील नसतो, अपीलची सोय नसते आणि न्यायाधीशांची नियुक्ती कोणी केली हेही कोणाला माहिती नसतं. 😁

ह्यातली मजेशीर गोष्ट अशी की दुसऱ्याच्या आयुष्याचं analysis करणाऱ्या माणसाचं स्वतःचं आयुष्यही अर्थातच perfect नसतं.

कुणाचंच नसतं.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही असं असतंच जे दुसऱ्या कोणाला तरी हास्यास्पद, चुकीचं किंवा विचित्र वाटू शकतं.

फरक एवढाच की समोरचा ते तोंडावर बोलत नाही.

आणि कदाचित त्यालाच शहाणपण म्हणतात.

Opinion असणं आणि Opinion वाटत फिरणं ह्यात फरक आहे

प्रत्येकाला मत असायलाच हवं.

मला अमुक गोष्ट आवडत नाही, तमुक lifestyle पटत नाही, फलाणा माणसाचं वागणं विचित्र वाटतं—हे सगळं अगदी स्वाभाविक आहे.

माणूस आहोत आपण. मेंदू observations करणारच.

समस्या opinion मध्ये नाही.

समस्या प्रत्येक opinion चं सार्वजनिक वितरण करण्याच्या आपल्या उत्साहात आहे.

मनात विचार आला म्हणजे तो तोंडातून बाहेर आलाच पाहिजे असा काही कायदा नाही.

काही opinions हे WhatsApp draft सारखे असतात.

लिहायचे.

एकदा वाचायचे.

आणि delete करायचे. 😁

कारण आपल्याला एखादी गोष्ट आवडत नाही हे समोरच्याला सांगितल्याने नेमकं काय साध्य होणार आहे, हा प्रश्न आपण स्वतःला फार कमी वेळा विचारतो.

समोरच्याच्या भल्यासाठी सांगतोय?

आपल्यावर त्याचा थेट परिणाम होतोय म्हणून सांगतोय?

की फक्त त्याला थोडंसं कमीपणाचं वाटावं म्हणून बोलतोय?

हा तिसरा प्रकार फार विचित्र आहे.

काही लोक criticism अशा पद्धतीने करतात की त्यातून कोणतीही सुधारणा अपेक्षित नसते. समोरच्याचा आत्मविश्वास दोन इंच खाली गेला की काम झालं.

त्याला constructive criticism म्हणत नाहीत.

त्याला साध्या भाषेत टोचून बोलणं म्हणतात.

प्रत्येक गोष्टीवर गप्प बसायचं का? अर्थातच नाही!

आता इथे दुसरं टोकही नको.

“त्याची choice आहे” ह्या नावाखाली प्रत्येक गोष्ट दुर्लक्षित करता येत नाही.

कारण आपल्या choices चे परिणाम फक्त आपल्यावरच होत असतील असं नेहमी नसतं.

समजा एखाद्या माणसाला दारू प्यायला आवडते.

तो म्हणू शकतो, “माझी choice आहे.”

ठीक.

पण त्या सवयीमुळे त्याची तब्येत बिघडत असेल, घरात आर्थिक समस्या निर्माण होत असतील, पत्नी-मुलांना त्रास होत असेल, त्याच्या वागण्यात बदल होत असेल तर त्याच्या बायकोला नक्कीच बोलण्याचा अधिकार आहे.

कारण आता ती choice फक्त त्याच्यापुरती राहिलेली नाही.

तिचे परिणाम तिच्या आयुष्यावरही होत आहेत.

पण ह्याच माणसाच्या दारू पिण्यावर सोसायटीतले शेजारचे काका जर चौकात उभं राहून,

“आजकालची पिढीच बिघडली आहे!”

अशी घोषणा करत असतील, तर काकांनी जरा स्वतःच्या बाल्कनीकडे लक्ष द्यायला हरकत नाही.

प्रश्न साधा आहे—

त्या व्यक्तीच्या वागण्याचा तुमच्या आयुष्यावर प्रत्यक्ष परिणाम होतोय का?

होत असेल तर बोला.

नातं जवळचं असेल, काळजी असेल, परिणाम तुमच्यावर होत असेल—बोला. अर्थात बोलण्याची पद्धत तरीही महत्त्वाची आहे.

पण समोरचा स्वतःच्या विश्वात आनंदात आहे, कोणाला त्रास देत नाही, कोणाच्या आयुष्यात लुडबुड करत नाही, समाजात उपद्रव निर्माण करत नाही आणि त्याची एखादी harmless गोष्ट फक्त तुम्हाला आवडत नाही

तर कदाचित समस्या त्याच्या choice मध्ये नसून आपल्या tolerance मध्ये आहे.

“मी असं कधीच करणार नाही” — उत्तम! मग करू नका.

हे एक फार सुंदर वाक्य आहे.

“मी असं कधीच करणार नाही.”

Excellent.

करू नका.

पण दुसरा करत असेल तर?

त्याला करू द्या.

आपल्याला प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या आयुष्याची software update करण्याची गरज नसते.

आपण अनेकदा स्वतःच्या preferences ला principles समजतो.

मला साधं राहायला आवडतं, म्हणजे दिखाऊपणा करणारा चुकीचा.

मला पैसा वाचवायला आवडतो, म्हणजे महाग वस्तू घेणारा मूर्ख.

मला पार्टी आवडत नाही, म्हणजे पार्टी करणारे shallow.

मला सोशल मीडिया आवडत नाही, म्हणजे स्टोरी टाकणारे attention seekers.

मला gym आवडतो, म्हणजे gym ला न जाणारा आळशी.

मला पुस्तके आवडतात, म्हणजे reels बघणारा निर्बुद्ध.

पण ह्यातलं बरंचसं morality नाही.

ही फक्त preference आहे.

आणि स्वतःच्या preference ला नैतिक श्रेष्ठतेचं certificate देणं ही judgement ची सुरुवात असते.

काही लोकांना दुसऱ्याचा आनंदही संशयास्पद वाटतो

आपल्याकडे अजून एक मजेशीर सवय आहे.

एखादा माणूस जरा जास्त आनंदात दिसला की आपल्याला संशय येतो.

रोज फिरतोय?

“कामधंदा नाही वाटतं.”

फोटो टाकतोय?

“दाखवण्यासाठी करतोय.”

महाग फोन घेतला?

“EMI वर घेतला असेल.”

फिटनेसचे फोटो टाकतो?

“Attention पाहिजे.”

बायकोबरोबर फोटो टाकतो?

“ज्यांचं खरंच चांगलं चाललेलं असतं ते सोशल मीडियावर दाखवत नाहीत.”

आता हे शेवटचं logic ऐकल्यावर तर माणसाने आनंदी दिसायचं तरी कसं?

फोटो टाकला तर relationship खराब.

फोटो नाही टाकला तर “काहीतरी बिनसलंय.”

म्हणजे Sherlock Holmes आपल्या आत इतका खोलवर बसलेला आहे की पुरावा नसतानाही investigation पूर्ण. 😁

कदाचित काही वेळा माणूस फिरायला गेला कारण त्याला फिरायला आवडतं.

कदाचित फोटो टाकला कारण फोटो छान आला.

कदाचित बायकोबरोबर फोटो टाकला कारण दोघे आनंदात होते.

प्रत्येक गोष्टीमागे psychological thesis असण्याची गरज नाही.

कधी कधी चहा म्हणजे फक्त चहा असतो.

दुसऱ्याला कमी लेखून स्वतःची choice मोठी होत नाही

ह्या सगळ्यात मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते ती ही.

आपली जीवनपद्धती योग्य ठरवण्यासाठी दुसऱ्याची चुकीची ठरवण्याची गरज नसते.

तुम्हाला private आयुष्य आवडतं?

सुंदर.

तुम्हाला सोशल मीडिया आवडतो?

तेही सुंदर.

तुम्हाला चार लोकांत मिसळायला आवडतं?

छान.

तुम्हाला एकटं राहायला आवडतं?

छान.

तुम्ही लग्न करून खूश आहात?

उत्तम.

तुम्हाला single राहायचं आहे?

तेही उत्तम.

तुमची choice मजबूत असेल तर तिच्या समर्थनासाठी दुसऱ्याच्या choice ची टिंगल करावी लागत नाही.

उलट सतत दुसऱ्याची जीवनपद्धती चुकीची सिद्ध करण्याची गरज वाटत असेल, तर कदाचित आपण स्वतःच्या निर्णयाबद्दलच पूर्णपणे comfortable नाही.

कारण genuinely समाधानी माणूस सहसा दुसऱ्याच्या ताटात किती भाजी आहे हे मोजत बसत नाही.

तो स्वतःचं जेवण खातो.

वय वाढणं आणि mature होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत

एका ठरावीक वयानंतर निदान एवढं तरी उमगायला हवं की जगात सगळे लोक आपल्यासारखे नसणार आहेत.

आणि ही फार चांगली गोष्ट आहे.

कल्पना करा, सगळ्यांना एकच संगीत आवडतंय. सगळ्यांचे कपडे सारखे. सगळ्यांच्या सुट्ट्या सारख्या. सगळ्यांची मतं सारखी. सगळ्यांचा lifestyle सारखा.

दोन दिवसांत कंटाळून आपणच म्हणू,

“कोणीतरी काहीतरी वेगळं करा रे!”

लोक वेगवेगळे आहेत म्हणून जग interesting आहे.

Maturity म्हणजे प्रत्येक गोष्ट आवडायला लागणं नाही.

Maturity म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसतानाही ती दुसऱ्याची choice असू शकते हे मान्य करता येणं.

हे जरा कठीण आहे.

कारण “मला आवडत नाही” म्हणणं सोपं आहे.

“मला आवडत नाही, पण तुला आवडत असेल तर enjoy” इथपर्यंत पोहोचायला थोडी मानसिक जागा लागते.

शेवटी judgement पूर्णपणे बंद होणार आहे का?

नाही.

आपण सगळेच judge करतो.

मीही करतो.

तुम्हीही करता.

हे वाचताना तुम्ही कदाचित मला judge करत असाल.

आणि हा ब्लॉग लिहिताना मी judgemental लोकांना judge करतोय, हीसुद्धा ह्या विषयातली सुंदर irony आहे. 😁

मुद्दा judgement मनात येऊच नये असा नाही.

मुद्दा एवढाच आहे की प्रत्येक judgement ला microphone देण्याची गरज नसते.

कधी कधी एखाद्याकडे पाहून मनात म्हणावं,

“बाबा रे, मला हे अजिबात पटत नाही.”

आणि पुढच्या क्षणी स्वतःलाच म्हणावं,

“पण त्याचं आयुष्य आहे. चालू दे.”

विषय संपला.

मन शांत.

नाती सुरक्षित.

समोरच्याचा आत्मविश्वास सुरक्षित.

आणि आपला BP सुद्धा सुरक्षित. 😁

माणसाला स्वतःच्या पद्धतीने जगू देण्यात आपलं काहीही जात नाही.

जोपर्यंत त्याच्या choice मुळे आपल्याला, त्याच्या जवळच्या लोकांना किंवा समाजाला प्रत्यक्ष नुकसान होत नाही, तोपर्यंत प्रत्येक वेळी न्यायाधीशाचा कोट घालण्याची गरज नाही.

कारण शेवटी आयुष्य प्रत्येकाचं वेगळं आहे.

कोणाला ते जगायला आवडतं.

कोणाला ते दाखवत जगायला आवडतं.

कोणाला private ठेवायला आवडतं.

कोणाला दिवसाला सात स्टोरी टाकून आठवीत “Good Night Guys” लिहायला आवडतं.

सगळं चालतं. 😁

फक्त स्वतःची choice जगताना दुसऱ्याच्या choice चा अपमान करण्याची गरज नाही.

आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की private आयुष्य जगणं ही फार मोठी achievement आहे, तर माझी काही हरकत नाही.

फक्त तो ‘जितेंद्र अवॉर्ड’ कुठे मिळतो ते मला नक्की सांगा.

पुढच्या वर्षी nomination तरी भरून ठेवतो. 😁

×